महिलांच्या स्वावलंबनाला नवी दिशा; ४ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना इम्तियाज जलील यांच्या दुआ फाउंडेशनकडून मोफत शिलाई मशीन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) डि १९ :- महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दुआ फाउंडेशनच्या वतीने शहरातील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे मोफत शिलाई मशीन वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महिलांना चार महिन्यांचे शिलाई प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रासह मोफत शिलाई मशीन देण्यात आली. या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर होऊन आपल्या कौशल्याचा उपयोग उत्पन्नाचे साधन म्हणून करावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाला AIMIM महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. यावेळी नौखंडा महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. अनीस फातिमा तसेच आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. नाझिमा खान यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
चार महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महिलांच्या हातात शिलाई मशीन देण्यात आल्याने त्यांना घरातूनच काम सुरू करण्याची आणि आपल्या कौशल्यातून उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी संचालिका रूमी जलील यांनी प्रमुख अतिथी, प्रशिक्षणार्थी महिला तसेच उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले.
महिलांना केवळ प्रशिक्षण देण्याऐवजी त्यानंतर रोजगारासाठी आवश्यक साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. त्यामुळे कौशल्य, संधी आणि आत्मनिर्भरता या तीनही बाबींना या उपक्रमातून जोडण्याचा प्रयत्न दिसून आला.
— अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित