महायुतीच्या विजयामागे ‘सावे फॅक्टर’? जिल्हा बँकेत पुन्हा ताकद सिद्ध
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ६ :- महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधान परिषद, क्रिकेट असोसिएशन आणि आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सलग यश मिळवत ना. अतुल सावे यांनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाची आणि राजकीय रणनीतीची वेगळी छाप उमटवली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणत (५७) शहराच्या राजकारणात पक्षाची ताकद वाढविण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार वाढविण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जागा पक्षाकडे कायम ठेवत सुहास शिरसाठ यांना विजयी करण्यात त्यांची भूमिका चर्चेत राहिली. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक अधोरेखित झाला.
आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश संपादन केले आहे. २० पैकी १९ जागांवर विजय मिळवत महायुतीने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत ना. अतुल सावे यांनी २६७ मते मिळवत उल्लेखनीय विजय नोंदविला.
या सलग यशामागे मजबूत संघटन, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क, नियोजनबद्ध कामकाज आणि वेळेनुसार निर्णय घेण्याची क्षमता हे महत्त्वाचे घटक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार क्षेत्र आणि इतर संघटनात्मक स्तरांवर त्यांचे नेतृत्व अधिक प्रभावी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विजयाची ही मालिका केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून संघटन उभारणी आणि नेतृत्व क्षमतेचे उदाहरण म्हणूनही पाहिली जात आहे.
“राजकारण, सहकार आणि संघटन… विजयाची ही मालिका पुढे कुठपर्यंत जाणार? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत!”