‘महापौरपदावर मोठा ट्विस्ट!’ — “१० तारखेला पत्ते उघडणार”, इम्तियाज जलील यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- महानगरपालिका महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला चांगलाच उकळा आला आहे. ५७ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ५८ च्या आकड्यापासून अवघ्या एका जागेने ते दूर असल्याने सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. अशातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे.
“राजकारणात काहीही होऊ शकते. १० तारखेला सगळे पत्ते उघडतील,” असे विधान करत जलील यांनी महापौर निवडणुकीतील सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. ३३ जागांसह एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला असून, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएम कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महापौर निवडणुकीसाठी एमआयएमने आपला उमेदवार उभा केल्याने राजकीय चुरस वाढली असून, भाजपविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आहे. विशेष म्हणजे, भाजपला शह देण्यासाठी एमआयएम शिवसेनेसोबत जाण्याचाही विचार करत असल्याचे संकेत जलील यांनी दिले आहेत. सध्या विविध पक्षांशी चर्चा व वाटाघाटी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्या एकूण ११५ जागांपैकी बहुमतासाठी ५८ जागांची गरज आहे. भाजपकडे ५७ जागा असताना, एमआयएम (३३), शिंदे गटाची शिवसेना (१३), ठाकरे गटाची शिवसेना (६), वंचित (४), काँग्रेस (१) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (१) या पक्षांनी एकत्र येताच ‘मॅजिक फिगर’ गाठली जाऊ शकते.
तांत्रिकदृष्ट्या हे समीकरण शक्य असले, तरी राज्यातील सध्याच्या महायुतीच्या राजकीय वास्तवामुळे भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. मात्र, राजकारणातील अनिश्चिततेमुळे सर्व विरोधक एकत्र येत भाजपला धक्का देणार का, याबाबतचे औत्सुक्य दिवसेंदिवस वाढत आहे.
👉 आता सर्वांचे लक्ष १० तारखेकडे — महापौरपदावर कोणाचा झेंडा फडकणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.