"मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांचा वीजपुरवठा अखंडित ठेवा – प्रशासक जी. श्रीकांत"

महावितरण, परिवहन विभाग व मनपाची संयुक्त आढावा बैठक

"मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांचा वीजपुरवठा अखंडित ठेवा – प्रशासक जी. श्रीकांत"
"मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांचा वीजपुरवठा अखंडित ठेवा – प्रशासक जी. श्रीकांत"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली असून, त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी आज स्मार्ट सिटी कार्यालय येथे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रीय परिवहन विभाग, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकारी-प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रांवर वीजपुरवठा अखंडित राहील याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश महावितरण विभागाला दिले. यासोबतच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित कार्यालयांचा वीजपुरवठाही कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहील, याची पूर्वतयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला संबोधित करताना त्यांनी मद्याच्या अवैध विक्री व वाटपावर कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले. ज्या ठिकाणी मद्याची बेकायदेशीर विक्री अथवा वितरण होत असल्याचे आढळून येईल, त्या ठिकाणी तात्काळ छापेमारी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

परिवहन विभागाला मार्गदर्शन करताना प्रशासकांनी मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिंग पार्टींच्या ने-जा व्यवस्थेसाठी, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यक त्या वाहनांची योग्य आणि वेळेवर व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत उपस्थित बँक प्रतिनिधींना सूचित करण्यात आले की प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्यात यावे तसेच निवडणूक काळात होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवून संशयास्पद व्यवहारांची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांना द्यावी.

या संयुक्त बैठकीस मुख्य अभियंता (महावितरण) पी. एच. कचोट, क्षेत्रीय परिवहन अधिकारी विजय काठोळे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे, उप आयुक्त तथा निवडणूक विभाग प्रमुख विकास नवाळे यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व पंजाब नॅशनल बँक यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.