फुलंब्री शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखड्यास (DP Plan) राज्य शासनाची मंजुरी!

आमदार अनुराधा चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

फुलंब्री शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखड्यास (DP Plan) राज्य शासनाची मंजुरी!

महाराष्ट्र वाणी न्युज 

फुलंब्री दि १ ऑगस्ट :- फुलंब्री शहराच्या विकासासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या डी.पी. प्लानला महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात गट क्रमांक १७ मध्ये सुधारणा करून बोगस एन.ए. प्रकरणातील १५९ प्लॉट धारकांना दिलासा देण्यात आला असून, त्यांना बांधकामासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार आहे.

विकास योजनेत सार्वजनिक उद्याण, शैक्षणिक संकुल, खेळाचे मैदान, टाऊन प्लाझा, एसटीपी प्रकल्प, अग्निशमन केंद्र, स्मशानभूमी व दफनभूमी, व्यापारी संकुल, जलशुद्धीकरण केंद्र, पाणीपुरवठा जलकुंभ तसेच नगरपंचायतीच्या विविध विकास कामांसाठी आवश्यक ते आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर-जळगाव आणि खुलताबाद महामार्गालगत सुमारे ५०० मीटर पर्यंतचा परिसर ‘यलो झोन’ म्हणून निश्चित करण्यात आला असून, यामुळे नियोजनबद्ध व सुनियोजित विकासाला गती मिळणार आहे.

शहर व शहरालगत मोठ्या प्रमाणात डी.पी. रस्त्यांचे जाळे विकसित करण्यात येणार आहे, जे दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच, तुकडाबंदी कायद्यानुसार अनधिकृत बांधकामे आता गुंठेवारी अधिनियमांतर्गत नियमबद्ध होतील. त्यामुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांना आणि नागरिकांना कर्जप्रकरणांसाठी अधिक सुलभता मिळणार असून, बांधकाम व्यवहार अधिकृत मार्गाने शक्य होतील. आमदार अनुराधा चव्हाण यांनी पाठपुरावा केल्या मुळे हे सर्व शक्य झाले आहे.