फर्दापूर–सावळदबारा ३३ केव्ही वीजवाहिनीच्या ४३ किमी कामाला प्रत्यक्ष सुरुवात; १६ गावांचा वीजपुरवठा होणार सक्षम
महाराष्ट्र वाणी
फर्दापूर दि ६ :- फर्दापूर ते सावळदबारा दरम्यान उभारण्यात येणाऱ्या ३३ केव्ही वीजवाहिनीच्या तब्बल ४३ किलोमीटर लांबीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे सावळदबारा परिसरातील १२ गावे आणि जामठी परिसरातील ४ गावांच्या वीजपुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
या महत्त्वपूर्ण वीजवाहिनी प्रकल्पाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी फर्दापूर येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले होते. उद्घाटनानंतर आता प्रत्यक्ष यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वीजवाहिनी उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
कामाच्या प्रगतीची पाहणी भाजप अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी केली. वीजवाहिनीचे काम सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रकल्पामुळे संबंधित १६ गावांना अधिक सक्षम आणि दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विशेषतः आगामी रब्बी हंगामात कृषीपंपांसाठी वीजपुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या वेळी पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.