पॅन्टवरून उघडकीस आला खून! विहिरीत दगड बांधून मृतदेह टाकणाऱ्या आरोपींना शिल्लेगाव पोलिसांनी केली अटक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १० :-
पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील एक अत्यंत गंभीर आणि थरारक खुनाचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मृतदेहाची ओळख अंगावरील पॅन्टच्या आधारे पटवून पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश केला.
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता, एकभुर्जीवाघलगाव (शहानवाजपुर) येथील कर्नावट यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हात-पाय दोरीने बांधून मृतदेह पांढऱ्या पन्नीमध्ये गुंडाळण्यात आला होता. त्यात दगड बांधून विहिरीत टाकण्यात आले होते.
या प्रकरणी दि. २७/०१/२०२६ रोजी गुन्हा क्रमांक ४५/२६ अंतर्गत कलम १०३(१), २३८ BNS प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निर्देश
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी तपासाला गती देण्याचे आदेश दिले. तसेच
अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह आणि उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाचे निर्देश दिले.
पॅन्टवरून ओळख पटली, डीएनएने शिक्कामोर्तब
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी तपासाची चक्रे फिरवत मृताची ओळख पटवण्यासाठी गोपनीय माहिती घेतली. गावातील एक व्यक्ती दोन-तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले.
नातेवाईकांनी मृतदेह ओळखण्यास नकार दिल्याने संशय वाढला. अखेर मृताच्या आईचे डीएनए सॅम्पल घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली असता मृताची ओळख निश्चित झाली.
आईच मुख्य सूत्रधार? मित्राला दिली सुपारी!
तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मृताच्या आईनेच मृताचा मित्र
गोरख शेकू आहिरे (रा. एकभुर्जीवाघलगाव)
आणि जावई
कमलसिंग साहेबसिंग सिंगल (रा. टाकळीवाडी)
यांना “तो मला त्रास देतो, त्याचा काटा काढा” असे सांगून सुपारी दिल्याचे उघड झाले.
आईने गोरखला ३० हजार रुपये दिले असून खून केल्यानंतर आणखी ५० हजार देण्याचे आश्वासन दिले होते.
दारू पाजून रॉडने मारून हत्या, मृतदेह विहिरीत टाकला
दि. २३ जानेवारी २०२६ रोजी, आरोपींनी मृतास पोटुळ रेल्वे स्टेशनवरून उचलून शिवरस्त्यावर नेले. दारू पाजून त्याच्या डोक्यात व शरीरावर रॉडने मारून हत्या केली.
नंतर मृतदेह पांढऱ्या पन्नीत गुंडाळून दगड बांधून विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोउपनि जी.बी. काळे, तसेच इतर पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली.
गुन्हेगार कितीही शिताफीने पुरावे नष्ट करत असले, तरी पोलिसांचा तपास सत्य बाहेर आणतोच…!