पिशोर पोलिसांची धडक कारवाई; ₹२.२४ लाखांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त
महाराष्ट्र वाणी
कन्नड, दि. ३ ऑगस्ट :- पिशोर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून ₹२ लाख २४ हजार ८० रुपयांचा अवैध देशी व विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिंचोली ली. (ता. कन्नड) येथील विनोदकुमार रामगोपाल जैस्वाल (वय ४८) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये कोणताही वैध परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्याचा साठा बेकायदेशीररीत्या ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
कारवाईदरम्यान विविध प्रकारच्या मद्याचा एकूण ₹२ लाख २४ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाणे पिशोर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक बर्डे करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच कन्नड उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे, सहाय्यक फौजदार कराळे, पोलीस नाईक बर्डे, पोलीस कर्मचारी गणेश कव्वाल, पवन खंबाट, सपकाळ, भोटकर, महिला पोलीस शिपाई देवरे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कार्यालयातील अमोल गायकवाड, मयूर वाळुंजकर, घुगे आणि प्रमोद सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.