पावसाळी आपत्तींसाठी मनपा सज्ज! नियंत्रण कक्षाच्या पाहणीत आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश

पावसाळी आपत्तींसाठी मनपा सज्ज! नियंत्रण कक्षाच्या पाहणीत आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर, दि. 24 : पावसाळ्यात नागरिकांना तात्काळ आणि प्रभावी सेवा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी कार्यालयातील पावसाळी नियंत्रण कक्षाची पाहणी करत आयुक्त अमोल येडगे यांनी विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या.

आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत उपायुक्त अंकुश पांढरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख स्वप्नील सरदार, अग्निशमन अधिकारी लोखंडे, आरआरटी सेल व आयटी सेलचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पावसाळी नियंत्रण कक्षातील उपस्थिती, तक्रार निवारण यंत्रणा आणि नागरिकांना जलद मदत पोहोचवण्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला. स्मार्ट सिटीच्या ICCC (Integrated Command and Control Centre) प्रणालीचा आपत्तीपूर्व तयारी आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.

शहरातील सखल भाग आणि पाणी साचणाऱ्या परिसरांवर सीसीटीव्हीद्वारे सातत्याने लक्ष ठेवून संबंधित विभागांना तत्काळ सूचना देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच पूरप्रवण भागांची यादी तयार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला.

कॅमेरे नसलेल्या भागांमध्ये स्थानिक नागरिकांचा संपर्क वाढवून परिस्थितीची माहिती मिळवणे, अत्यावश्यक सेवा आणि महत्त्वाच्या ठिकाणांचे मॅपिंग करणे, तसेच नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

याशिवाय स्मार्ट सिटी अंतर्गत असलेली सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली २४x७ सुरू ठेवणे, चॅटबॉटमध्ये आपत्ती व्यवस्थापन सेवा समाविष्ट करणे आणि पदमपुरा फायर कंट्रोल रूमचा व्हॉट्सअॅप क्रमांक नियंत्रण कक्षाशी जोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या शहरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आणि विश्वासार्ह अपडेट!