पाणीपुरवठ्यासाठी मोठा निर्णय! पाईपलाईन कामाला वेग देण्याचे आदेश

पाणीपुरवठ्यासाठी मोठा निर्णय! पाईपलाईन कामाला वेग देण्याचे आदेश

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २० :- शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन आता अॅक्शन मोडमध्ये आले असून, कांचनवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून शहरात पाणी आणण्यासाठी सुरू असलेल्या पाईपलाईन कामाला तातडीने गती देण्याचे कडक निर्देश स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी दिले.

आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन पाणीपुरवठा योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत जायकवाडी धरणातून शहरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. एकूण कामापैकी सुमारे 600 मीटर पाईपलाईन टाकण्याचे काम अद्याप बाकी असून, ते तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.

सभापती मकरिये यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शहरवासीयांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे उर्वरित कामात कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही.”

याचबरोबर शहरातील जुन्या व मुख्य पाणीपुरवठा लाईनची दुरुस्तीही तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले. वारंवार होणाऱ्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याने या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी माहिती देताना सांगितले की, उर्वरित पाईपलाईनचे काम येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, काम पूर्ण होताच तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. संबंधित विभागाला अंदाजपत्रक तयार करून पुढील कामेही गतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बैठकीला स्थायी समिती सदस्य सुरेंद्र कुलकर्णी, राज वानखेडे, कार्यकारी अभियंता वसंत भोय तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

👉 शहराच्या पाणीप्रश्नावर आता निर्णायक पाऊल उचलले जात असून, येत्या काही दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे…!