पाणीपुरवठा कामांना गती द्या; प्रलंबित देयके नियमानुसार तपासून अदा करा- प्रशासनाचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर,(औरंगाबाद) दि. ३० :- शहराला वेळेत पाणीपुरवठा व्हावा यासाठी कामे वेळेत पूर्ण करावीत आणि कंत्राटदारांची प्रलंबित देयके तपासूनच द्यावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व सदस्य सचिव अमगोथू श्री रंगा नायक यांनी दिले. एजन्सीने सादर केलेली देयके तपासणीनंतर पात्रतेनुसारच अदा केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजने संदर्भात न्यायालयात उपस्थित विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगोथू श्री रंगा नायक, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनय राठोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, योजनेचे प्रकल्प कंत्राटदार आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी योजनेतील पूर्ण व अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला.
कंत्राटदारांनी केलेल्या काही कामांची देयके प्रलंबित असणे गंभीर बाब आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी त्यांच्या प्रलंबित देयकांसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करावीत. तसेच, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या प्रलंबित देयकांची परिपूर्ण माहिती घेऊन नियमानुसार देयके देण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश देण्यात आले.
नागरिकांपर्यंत मुदतीत पाणी पोहोचविणे हे लक्षात घेऊन प्राधान्यक्रमानुसार कंत्राटदारांनी कामे मार्गी लावावीत. त्यानंतर किरकोळ कामे व त्यांची देयके सादर करावीत, म्हणजे महत्त्वाची कामे व त्यांची देयके प्रलंबित राहणार नाहीत. तसेच, कंत्राटदारांनी योजनेची कामे छोट्या-छोट्या कारणांमुळे थांबवू नयेत, असे सक्त निर्देशही जी. श्रीकांत व अमगोथू श्री रंगा नायक यांनी दिले.
यावेळी पोलीस आयुक्त श्री. पवार यांनी प्राधिकरणाच्या कामासाठी ठिकठिकाणी खोदलेल्या खड्ड्यांमुळे सीसीटीव्हीच्या केबल्स तुटल्याने अपघातप्रवण क्षेत्रांतील किंवा अपघातस्थळी फुटेज मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे तातडीने सीसीटीव्हीच्या तुटलेल्या केबल्स दुरुस्त कराव्यात व भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक श्री. राठोड यांनी प्राधिकरणाच्या कामांमुळे रस्त्यांवरील मार्किंग नष्ट होणे तसेच खड्ड्यांवर चेंबर नसल्याने मोठ्या अपघातांच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले. संबंधितांनी ही कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी केल्या.
श्रीमती पलांडे यांनी कंत्राटदारांनी परिपूर्ण कागदपत्रांसह सादर केलेली देयके वेळोवेळी अदा करण्यात आलेली असल्याचे सांगितले. तसेच, अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रलंबित असलेली देयके पडताळणी करून अदा करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले.
या बैठकीत प्रकल्प कंत्राटदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आपली देयके प्रलंबित असल्याची तक्रार न्यायालयासमोर केली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रकल्प कंत्राटदार यांच्यातील देयकासंबंधी सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत व सदस्य सचिव अमगोथू श्री रंगा नायक यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
देयकांच्या दाव्यांबाबतचे सर्व मुद्दे सविस्तरपणे विचारमंथन करून चर्चा करण्यात आली. यावेळी विभाग तसेच संबंधित एजन्सीला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
तसेच, एजन्सीने उर्वरित देयकांसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे पुढील तीन दिवसांत सादर करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.एजन्सीने सादर केलेले दावे विभागावर थेट बंधनकारक राहणार नाहीत. सर्व दावे नियमानुसार तपासणी व पडताळणी करूनच पात्रतेनुसार देयके अदा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.