पदवीधर निवडणुकीत नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही; जी. श्रीकांत यांचा उमेदवारांना इशारा

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांची बैठक; प्रचार, मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत दिल्या सूचना

पदवीधर निवडणुकीत नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही; जी. श्रीकांत यांचा उमेदवारांना इशारा
पदवीधर निवडणुकीत नियमांचे उल्लंघन खपवून घेणार नाही; जी. श्रीकांत यांचा उमेदवारांना इशारा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे, मंजुषा मिसकर, देविदास टेकाळे यांच्यासह उमेदवार उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. निवडणुकीसंदर्भातील तक्रारी किंवा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात, असेही श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

३ लाख २६ हजार मतदारांसाठी ८४२ मतदान केंद्रे

या मतदारसंघात एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार असून, मतदानासाठी ८४२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुमारे ३५० अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवार आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत ओळखपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. ओळखपत्राशिवाय मतदान केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान केंद्रात मोबाईल फोन तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्यासही मनाई असेल.

मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.

मतदानापूर्वी ४८ तास प्रचार बंद

मतदानाच्या ४८ तास आधी सर्व प्रकारचा निवडणूक प्रचार थांबविणे आवश्यक आहे. या कालावधीत सभा, ऑनलाइन माध्यमांद्वारे प्रचार किंवा मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रचारात्मक कृती करता येणार नाहीत. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना संबंधित जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

छापील प्रचार साहित्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नमूद करावा. जात, धर्म, भाषा किंवा लिंगाच्या आधारे मतदारांमध्ये भेदभाव निर्माण करणारा प्रचार करू नये. मतदारांना प्रलोभने देणे, धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करणे, मतदानाची गोपनीयता भंग करणे आणि मतदान केंद्राजवळ प्रचार करणे प्रतिबंधित आहे. बोगस मतदानाचा प्रकार आढळल्यास तातडीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले.

उमेदवारांसाठी स्वतंत्र कक्ष; जाहिरातींसाठी पूर्वपरवानगी आवश्यक

उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासह मराठवाड्यातील आठही जिल्हाधिकारी कार्यालयांत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या निवडणूकविषयक जाहिरातींचा मजकूर तपासून घेणे आवश्यक असून, त्यासाठी माध्यम सनियंत्रण व प्रमाणन केंद्राची परवानगी घ्यावी. आवश्यक परवानग्यांसाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

मतमोजणीसाठी ७१ टेबल; प्रतिनिधी नियुक्तीचे नियम स्पष्ट

मतमोजणी प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी वंदे मातरम् सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या तीन ते चार दिवस आधी उमेदवारांनी आपल्या प्रतिनिधींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी.

मतमोजणीसाठी ७० टेबल आणि टपाली मतपत्रिकांसाठी स्वतंत्र एक टेबल, अशी एकूण ७१ टेबलांची व्यवस्था असेल. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक टेबलासाठी एक याप्रमाणे ७१ प्रतिनिधी नियुक्त करता येतील. यासाठी निवडणूक आयोगाच्या विहित नमुन्यात अर्ज सादर करून अधिकृत ओळखपत्र घेणे आवश्यक आहे.

पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण

मतमोजणीदरम्यान कोणत्याही उमेदवाराला आवश्यक मतसंख्या मिळाली नाही, तर सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण केले जाईल. या प्रक्रियेनुसार मतमोजणी पुढे सुरू राहील.

बैठकीत सहआयुक्त प्रताप काळे आणि मंजुषा मिसकर यांनी निवडणूक प्रक्रिया, आचारसंहितेचे पालन, मतदान प्रतिनिधींची नियुक्ती, प्रचार साहित्याच्या मुद्रणासंबंधी नियम आणि मतदानाच्या दिवशी पाळावयाच्या सूचनांची सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित