नेपाळमध्ये बिडकीनच्या खेळाडूंचा डंका! आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत भारताला २ सुवर्णांसह ५ पदके; प्रशिक्षक डॉ. हाफिज इमरान यांचाही आंतरराष्ट्रीय सन्मान
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- नेपाळमध्ये पार पडलेल्या ओपन इंटरनॅशनल तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीनच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकविला. या स्पर्धेत बिडकीनच्या पाच खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकून उल्लेखनीय यश संपादन केले. या यशामुळे बिडकीनसह संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेपाळमधील सौराहा, चितवन जिल्हा येथे ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १९ देशांतील सुमारे ८०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भारतासह सौदी अरेबिया, श्रीलंका, व्हिएतनाम, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, चीन, दुबई, तैवान, मलेशिया, बांगलादेश, हाँगकाँग, थायलंड, कझाकस्तान, उझबेकिस्तान, नेपाळ, भूतान आणि इंडोनेशियासह विविध देशांतील खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले.
या स्पर्धेत बिडकीनच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत पदकांची लयलूट केली. सार्थक कृष्णा राठोड आणि हुमायूं हाफिज इमरान यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. आर्यन किशोर राठोड याने रौप्यपदक, तर अर्श सुफियान कुरेशी आणि अर्श अनीस शेख यांनी कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची आणि मेहनतीची छाप पाडली.
या यशात खेळाडूंना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक डॉ. हाफिज इमरान यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या उत्कृष्ट प्रशिक्षकीय कार्याची दखल घेत त्यांना स्पर्धेदरम्यान प्रतिष्ठेच्या ‘बेस्ट कोच इंटरनॅशनल अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे खेळाडूंच्या पदकांसोबतच प्रशिक्षकांचाही आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाल्याने बिडकीन तायक्वांदो संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बिडकीनसारख्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाच पदकांची कमाई करणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. जिद्द, मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडूही जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात, हे या खेळाडूंनी सिद्ध केले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे आणि प्रशिक्षक डॉ. हाफिज इमरान यांचे क्रीडाप्रेमी, नागरिक आणि विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित