नियमबाह्य रस्ता खोदकामावर मनपा स्थायी समिती सभापती अनिल मकरिये आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- धनमंडी बाग (जुना बाजार) आणि नारळी बाग परिसरात दोन वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेल्या सिमेंट-काँक्रीट रस्त्याची नियमबाह्य पद्धतीने तोडफोड करून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत असल्याच्या तक्रारीची महानगरपालिका स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या निवेदनानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
पाहणीदरम्यान सार्वजनिक रस्त्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाल्याचे तसेच उघड्या अवस्थेतील ड्रेनेजमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निदर्शनास आले. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ही गंभीर बाब असल्याचेही मकरिये यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य कामे किंवा सार्वजनिक रस्त्यांची अनधिकृत तोडफोड सहन केली जाणार नसल्याचे सांगत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार व्यक्ती व ठेकेदारांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नाल्यांची तातडीने आणि नियमित साफसफाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबविण्याचे आदेशही देण्यात आले.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या शहरातील प्रत्येक घडामोड सर्वात आधी!