नारेगाव–पिसादेवी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’? पावसात नागरिकांचा जीव धोक्यात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) दि २७ :- पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नारेगाव–पिसादेवी (दिशा निवारा) मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. मोठमोठे खड्डे, रस्त्यावर साचलेले पाणी आणि चिखलामुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील परिस्थितीमुळे वाहनचालकांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हा मार्ग MIDC परिसरात काम करणाऱ्या हजारो कामगारांसाठी महत्त्वाचा दुवा मानला जातो. त्याचबरोबर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक, शाळेच्या रिक्षा, दुचाकीस्वार आणि महिलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने रस्त्याची स्थिती लक्षात येत नसून, त्यामुळे लहान-मोठ्या अपघातांच्या घटना वाढत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना प्रश्न उपस्थित करत, “एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच याकडे लक्ष दिले जाणार का?” असा संतप्त सवाल दिशा निवारा येथील नागरिक देवराव बचके यानी उपस्थित केला आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
तुमच्या परिसरातही अशी समस्या आहे का? तुमचा आवाज ‘महाराष्ट्र वाणी’पर्यंत नक्की पोहोचवा.