नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची ‘संबोधी अकादमी’ला सदिच्छा भेट; पांडुरंग तांगडे पाटील यांचा सन्मान

मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची ‘संबोधी अकादमी’ला सदिच्छा भेट; पांडुरंग तांगडे पाटील यांचा सन्मान
नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांची ‘संबोधी अकादमी’ला सदिच्छा भेट; पांडुरंग तांगडे पाटील यांचा सन्मान

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित झालेले आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते डॉ. भीमराव हत्तिअंबीरे यांच्या ‘संबोधी अकादमी’ येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन आपुलकीने सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भीमराव हत्तिअंबीरे यांच्यात झालेल्या या स्नेहपूर्ण भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

मराठवाड्यातील शैक्षणिक विकास, सामाजिक प्रश्न, पदवीधर मतदारांच्या विविध समस्या तसेच तरुणांच्या शिक्षण आणि रोजगाराशी संबंधित विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पदवीधरांच्या अपेक्षा आणि प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील पदवीधर, विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात डॉ. भीमराव हत्तिअंबीरे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मराठवाड्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्य प्रवक्ते डॉ. भीमराव हत्तिअंबीरे, त्यांचे सहकारी आणि संबोधी अकादमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना यावेळी पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित