दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ७ हजार महिलांची दिवाळी होणार गोड! आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम
सिल्लोडमध्ये ७ हजार गरजू महिलांना दिवाळी शिध्याचे वाटप; संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा दिला विश्वास
सिल्लोड (प्रतिनिधी) दि ७ :- यंदा सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा कठीण परिस्थितीत गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या सामाजिक भावनेतून आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने शिवसेनेच्या वतीने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. सिल्लोड येथील शिवसेना भवनात तब्बल ७ हजार गरजू महिलांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या दिवाळी शिधा वाटप उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना सणासुदीच्या काळात काहीसा दिलासा मिळावा आणि त्यांच्या घरातही दिवाळीचा आनंद फुलावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी दुष्काळग्रस्त नागरिकांना धीर देत, परिस्थिती कितीही कठीण असली तरी कुणीही खचून जाऊ नये, असे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्यासह संपूर्ण राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही!
दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील असून, कोणत्याही परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सत्तार यांनी दिली.
सण-उत्सव हे केवळ आनंदाचे क्षण नसून समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची संधीही असते. याच भावनेतून ७ हजार महिलांना दिवाळी शिध्याचे वाटप करून शिवसेनेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांसाठी दिवाळीच्या काळात मिळालेला हा मदतीचा हात निश्चितच दिलासादायक ठरणार असून, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात या उपक्रमाची चर्चा होत आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित