श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार बापूसाहेब पठारे यांची सर्वानुमते निवड

मंदिराच्या विस्तारासह सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचा नवनियुक्त अध्यक्षांचा संकल्प

श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार बापूसाहेब पठारे यांची सर्वानुमते निवड

पुणे (प्रतिनिधी) दि ३० :- चंदननगर येथील प्रतिष्ठित श्री साईबाबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ट्रस्टच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या.

नवीन कार्यकारिणीत महेंद्र पठारे यांची व्हाईस चेअरमनपदी, सुदामराव मते यांची उपाध्यक्षपदी, निर्मलकुमार अंचलिया यांची कार्याध्यक्ष तथा महाव्यवस्थापकपदी, पंकज शिंदे यांची कोषाध्यक्षपदी, तर अॅड. दिलीप जेधे यांची कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र खवले यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी असल्याचा उल्लेखही ट्रस्टच्या प्रसिद्धिपत्रकात करण्यात आला आहे.

श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनासोबतच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिरे, कर्करोग तपासणी शिबिरे तसेच गरजूंसाठी विविध निःशुल्क सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून ट्रस्ट सातत्याने समाजोपयोगी कार्य करीत आहे.

नवनियुक्त चेअरमन आमदार बापूसाहेब पठारे यांनी भविष्यात साईबाबा मंदिराचा विस्तार करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच ट्रस्टच्या माध्यमातून संचालित मातोश्री अनुसया भवन हे गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर विविध सामाजिक संस्था, संघटना आणि समाजातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सदर प्रसिद्धिपत्रक ट्रस्टचे विश्वस्त राजेश सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित