डीपी आराखड्यात गंभीर घोळ; प्राचीन मंदिरांना धोका — आमदार संजय केनेकरांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) १५ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शहर विकास आराखड्यातील गंभीर त्रुटींचा मुद्दा आमदार संजयजी केनेकर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत लक्षवेधी क्रमांक २५६ द्वारे उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर व वस्तुनिष्ठ माहिती माध्यमांसमोर मांडली.
विकास आराखडा तयार करताना विविध शासकीय विभागांमध्ये आवश्यक समन्वय न राखता, जुने सर्वे नकाशे, गट नकाशे, गाव नकाशे तसेच प्रत्यक्ष अस्तित्वातील रस्ते व नाल्यांची योग्य पडताळणी न करता बेस मॅप तयार करण्यात आल्याचा आरोप आमदार केनेकर यांनी केला. या निष्काळजीपणामुळे नियोजनात अक्षम्य चुका झाल्या असून शहराचे ग्रामदैवत असलेले श्री संस्थान गणपती मंदिर तसेच हसिक सुपारी हनुमान मंदिरासह अनेक प्राचीन मंदिरे थेट डीपी रोडमध्ये बाधित दाखविण्यात आली आहेत.
श्री संस्थान गणपती मंदिर हे छत्रपती संभाजीनगरच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे केंद्र असून सर्व हिंदू सण-उत्सवांची सुरुवात याच मंदिराच्या पूजेने होते. अशा ऐतिहासिक व श्रद्धास्थानांना धोका निर्माण होणे म्हणजे संपूर्ण हिंदू समाजाच्या धार्मिक भावनांवर घाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाले असून काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचा संशय आमदार केनेकर यांनी व्यक्त केला. धार्मिक व ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी शहराचा विकास आराखडा गुपचूप पद्धतीने राबवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम व स्पष्ट मागणी आमदार संजय केनेकर यांनी केली.
शहर विकासाच्या नावाखाली श्रद्धास्थानांवर घाला असेल, तर तो छत्रपती संभाजीनगर कधीही सहन करणार नाही.