छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती; पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्घाटन

लहान मुलांची भीती दूर करून पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्याचा उपक्रम; अधिकारी आणि महिला विश्रांती कक्षाचीही सुविधा

छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती; पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्घाटन
छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची निर्मिती; पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- पोलीस ठाण्यात येणाऱ्या लहान मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात आपल्या तक्रारी मांडता याव्यात, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील छावणी पोलीस ठाण्यात बालस्नेही पोलीस कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या कक्षासह पोलीस निरीक्षक कार्यालयाचे नूतनीकरण, अधिकारी विश्रांती कक्ष आणि महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त छावणी विभागाचे मजहर सय्यद आणि छावणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कार्टून चित्रांतून मुलांसाठी आनंददायी वातावरण

कौटुंबिक वाद, बालकांवरील अत्याचार, छळ, हरवलेली मुले, बालकामगार आणि बालविवाह यांसारख्या विविध प्रकरणांमध्ये लहान मुलांना पोलीस ठाण्यात यावे लागते. मात्र, पोलिसांचा गणवेश, चौकशीची पद्धत आणि पोलीस ठाण्यातील औपचारिक वातावरण यामुळे अनेक मुले घाबरतात किंवा आपल्या मनातील गोष्टी स्पष्टपणे सांगण्यास संकोच करतात.

ही बाब लक्षात घेऊन छावणी पोलीस ठाण्यात मुलांच्या आवडीची कार्टून चित्रे, आकर्षक रंगसंगती आणि प्रसन्न वातावरण असलेला बालस्नेही कक्ष तयार करण्यात आला आहे. यामुळे मुलांचा मानसिक तणाव कमी होऊन त्यांना आपल्या अडचणी आणि तक्रारी मोकळेपणाने मांडता येतील, अशी अपेक्षा आहे.

बालकांचे हक्क आणि गोपनीयतेला प्राधान्य

बालकांशी संवाद साधताना त्यांचे वय, मानसिक स्थिती आणि भावनिक गरजा लक्षात घेऊन संवेदनशीलतेने वागण्यावर या उपक्रमात भर देण्यात येणार आहे. मुलांना घाबरवणे किंवा त्यांच्यावर दबाव आणण्याऐवजी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि गरजेनुसार योग्य मदत उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

बालकांची गोपनीयता, प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपतानाच त्यांच्या सर्वोत्तम हिताला प्राधान्य दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार बालकल्याण समिती, बालसंरक्षण यंत्रणा, समुपदेशक आणि इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून बालकांना मदत उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे.

पोलीस ठाणे हे केवळ तक्रार नोंदविण्याचे ठिकाण नसून, अन्यायग्रस्त बालकांना सुरक्षितता, आधार आणि न्याय मिळवून देणारे विश्वासाचे केंद्र असावे, ही या संकल्पनेमागील प्रमुख भूमिका आहे.

पोलीस अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी विश्रांती कक्ष

पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा तपास करणे, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणे तसेच विविध बंदोबस्ताची कर्तव्ये पार पाडावी लागतात. कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्यांना आवश्यक विश्रांती मिळावी, यासाठी अधिकारी विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र विश्रांती कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या सुविधांमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना आवश्यक विश्रांती मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या कार्यक्षमतेतही सकारात्मक वाढ होण्याची अपेक्षा आहे.

संवेदनशील आणि नागरिकाभिमुख पोलिसिंगच्या दिशेने पाऊल

छावणी पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्ष हा केवळ सुशोभीकरणाचा उपक्रम नसून, बालकांच्या मनातील भीती दूर करून पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बालकांना सुरक्षित वातावरणात मदत मिळावी, त्यांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद मिळावा आणि समाजातील प्रत्येक घटकाला पोलिसांकडून संवेदनशील व सहकार्यपूर्ण वागणूक मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित