छत्रपती संभाजीनगरच्या मोहल्ला वाचनालयाची राज्यभर चर्चा; ‘मोहल्ला लायब्ररी’ मॉडेलचा मुंबई-पुण्याच्या तरुणांकडून अभ्यास
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :- समाजात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी केवळ मोठी ग्रंथालयेच नव्हे, तर प्रत्येक परिसरात छोटी वाचनकेंद्रे उभी राहणे गरजेचे आहे. याच संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘मोहल्ला बाल वाचनालय अभियानाला’ मुंबई, पालघर, पुणे, नवी मुंबई आणि पनवेल येथून आलेल्या उच्चशिक्षित युवकांनी भेट देत या उपक्रमाची कार्यपद्धती जाणून घेतली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या ‘अभिसरण’ (Youth Exchange Program) उपक्रमांतर्गत हा विशेष अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात मरियम मिर्जा मोहल्ला बाल वाचनालय अभियानांतर्गत सुरू असलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मोहल्ला लायब्ररीला युवकांनी भेट दिली.
संस्कार धनावडे, करण जाधव, अंश सिन्हा, तुषार पाटील, भार्गव पाटील, भूमि शिंदे, भौमी घरत, वैदेही टेकडे, प्राजक्ता सोबले, गायत्री सुतार आणि वैभव तांगडे यांचा या अभ्यासदौऱ्यात सहभाग होता.
यावेळी युवकांनी मोहल्ला लायब्ररीची दैनंदिन कार्यपद्धती, लहान मुलांमध्ये वाचनाची सवय निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, मुलांचा सहभाग वाढविण्याच्या पद्धती तसेच वाचनालय चालविताना येणाऱ्या विविध अडचणींची माहिती घेतली.
युवकांनी रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्यूम नदवी यांच्याशी संवाद साधत मोहल्ला वाचनालयाची संकल्पना, तिची सामाजिक उपयुक्तता आणि या माध्यमातून मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या वाचनाच्या सवयीबाबत सविस्तर चर्चा केली.
या उपक्रमातून प्रभावित झालेल्या युवकांनी आपल्या-आपल्या परिसरातही अशाच पद्धतीने मोहल्ला लायब्ररी सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. त्यामुळे हा दौरा केवळ एखाद्या वाचनालयाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यापुरता मर्यादित न राहता, एका परिसरातून दुसऱ्या परिसरात वाचनाची संस्कृती पोहोचविणाऱ्या व्यापक चळवळीची प्रेरणा ठरला आहे.
लहान मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक पोहोचविणे, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणे आणि त्यातून विचारशील पिढी घडविणे, हा या मोहल्ला लायब्ररी उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित