चेतनानगर, सईदा कॉलनी व हरीओमनगरला विकासाची नवी वाट; आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते १ कोटींच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे लोकार्पण
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १ अंतर्गत चेतनानगर, सईदा कॉलनी आणि हरीओमनगर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा विकासाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे १ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आणि दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे लोकार्पण आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या भागातील नागरिकांना अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना खड्डे, चिखल आणि वाहतुकीच्या समस्यांमुळे त्रास सहन करावा लागत होता. नव्याने तयार झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांमुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले की, "हा रस्ता केवळ वाहतुकीचा मार्ग नसून परिसराच्या सर्वांगीण विकासाची नवी वाट आहे. चांगल्या पायाभूत सुविधांमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावेल, तसेच शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक व्यवसायालाही चालना मिळेल. नागरिकांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत."
लोकार्पणानंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार जैस्वाल यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. "दिलेला शब्द पाळला" अशी भावना नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आली.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक रुपचंद वाघमारे, किशोर नागरे, राजगौरव वानखेडे, तसेच मोईन शेख, अनिल सोनवणे, एजाज शेख, सुमित वाघमारे, शत्रुघ्न दवणे, राहुल जाधव, विठ्ठल औताडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.
विकासकामांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १ मध्ये मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.