चाकूचा धाक, दोन अल्पवयीन मुलांकडून मोबाईल लुटणाऱ्या सराईत आरोपीला अवघ्या 2 तासांत बेड्या!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ :- चाकूचा धाक दाखवून दोन अल्पवयीन मुलांकडून मोबाईल फोन लुटणाऱ्या सराईत आरोपीला जवाहरनगर बिट मार्शल पथकाने अवघ्या दोन तासांत अटक करत प्रभावी कामगिरी केली आहे. आरोपीकडून चोरीची HF डिलक्स दुचाकी व चार महागडे मोबाईल असा सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी शंकर राजाराम बिरादार (वय 45, रा. अरिहंतनगर) यांचा 16 वर्षीय मुलगा व त्याचा मित्र क्लासवरून घरी जात असताना पंटवटी हॉटेलसमोर एका इसमाने त्यांना अडवले. गळ्याला हात टाकून चाकूचा धाक दाखवत त्यांना बाजूच्या गल्लीमध्ये नेऊन रेडमी कंपनीचे दोन मोबाईल जबरदस्तीने लुटून आरोपी फरार झाला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गु.र.नं. 23/2026, कलम 309(4) भा.न्या.संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच बिट मार्शलचे पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता आरोपी शिवाजीनगर परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या आदेशाने तात्काळ पथक रवाना झाले. शिवाजीनगर खडी मशीन परिसरात निलगीरीच्या झाडाजवळ अंधारात विना नंबरची मोटारसायकल घेऊन उभा असलेला इसम पोलिसांना पाहून पळू लागला. मात्र थोड्याच अंतरावर त्याला पकडण्यात आले.
अधिक चौकशीत आरोपीने दुचाकी चोरीची तसेच चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटल्याची कबुली दिली. तपासात ही दुचाकी पोस्टे जवाहरनगर गु.र.नं. 434/2025, कलम 303(2) अंतर्गत चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
अटक आरोपीचे नाव जय सतिश साळवे (वय 19, रा. बौद्धनगर, छत्रपती संभाजीनगर) असे असून, त्याच्यावर यापूर्वीही लूटमारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी 15 दिवसांपूर्वीच हर्सल जेलमधून सुटला होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपआयुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोउपनि केदारे, सहा. फौ. रमेश जाधव, पोहवा अनिल भाले व बिट मार्शल पोअं. मारोती गोरे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
👉 शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांची ही झटपट कारवाई नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.