घरफोडीचा मास्टरमाईंड जेरबंद; LCB ची धडाकेबाज कारवाई, दोन गुन्हे उघड!

घरफोडीचा मास्टरमाईंड जेरबंद; LCB ची धडाकेबाज कारवाई, दोन गुन्हे उघड!

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ :- 

घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी फिर्यादी श्री. सोमिनाथ शामराव हुलसार (वय 40, रा. खोडेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 50/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305(अ), 331(3) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथक तपास करत होते. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या माहितीनुसार अरुण ऊर्फ आवड्या अभिमान काळे (वय 25, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड) हा आरोपी निष्पन्न झाला.

दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी शहागड येथील जुन्या पुलाजवळ सापळा रचून आरोपीस शिताफीने अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने चिकलठाणा हद्दीतील घरफोडीची कबुली दिली तसेच पाचोड पोलीस ठाणे हद्दीत पैठण तालुक्यातील होणोबाची वाडी येथे दिवसा घरफोडी केल्याचेही मान्य केले.

आरोपीने दोन्ही गुन्ह्यातील चोरीचे सोन्याचे दागिने शहागड येथील सोनारास विकल्याची माहिती दिली. तपासादरम्यान संबंधित सोनाराकडून 16 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून आरोपीकडील उर्वरित 5 हजार रुपये रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. एकूण 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदर आरोपीच्या साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपास चिकलठाणा पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, बलवीरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जीवन घोलप तसेच फिंगरप्रिंट विभागातील पठाण व परमेश्वर आडे यांनी केली.

घरफोडी करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक कायम — गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटका नाही.