ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातच उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न सोडवावेत; एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी
ऑफलाइन पीक पाहणीसह प्रलंबित महसूल कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश; मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २६ :- ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता गावपातळीवर प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांचे तातडीने निराकरण करावे. ज्या गावांमध्ये स्वतंत्र कार्यालय उपलब्ध नाही, तेथे ग्रामपंचायत कार्यालयातील स्वतंत्र खोली, चावडी किंवा सभागृहाचा वापर करून नागरिकांना महसूल सेवा द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. तसेच आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढवून प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि. २६) वंदे मातरम् सभागृहात मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्यासाठी एकदिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) एकनाथ बंगाळे यांच्यासह तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी संविधान दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करवून घेतले. यावेळी संविधानातील मूल्ये व तत्त्वांचे स्मरण करण्यात आले.
नेटवर्क नसले तरी ऑफलाइन पीक पाहणी करा
पीक पाहणीच्या कामात नेटवर्क उपलब्ध नसल्याची अडचण अनेकदा सांगितली जाते. मात्र, पीक पाहणीसाठी ऑफलाइन सुविधाही उपलब्ध असून, नेटवर्क नसलेल्या भागात जीपीएसच्या मदतीने पीक पाहणी करता येते. त्यामुळे नेटवर्कअभावी कामे प्रलंबित न ठेवता उपलब्ध तांत्रिक सुविधांचा योग्य वापर करून निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शासकीय सेवेत नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेऊन प्रत्येकाने काम करण्याची पद्धत अधिक प्रभावी बनवावी. कामाचा व्याप वाढत असताना कोणते काम कमी वेळेत आणि अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करता येईल, याचा विचार करून स्मार्ट पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशासकीय कामांसाठी एआयचा वापर करा
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे प्रशासकीय कामकाज सुलभ करणारे प्रभावी साधन आहे. शासकीय पत्रांचे मसुदे, पंचनामे, अहवाल आणि नियमित प्रशासकीय कामांचे प्रारूप तयार करण्यासाठी एआयचा उपयोग करता येतो. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः वेळ देऊन या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घ्यावे. योग्य माहिती आणि आवश्यक तपशील देऊन एआयचा वापर केल्यास कामाचा वेळ वाचण्यासोबतच कार्यक्षमताही वाढेल.
कोतवाल, पोलीस पाटील भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार
गावपातळीवरील मनुष्यबळाच्या कमतरतेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यास मदत होईल. तोपर्यंत उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य समन्वय साधून कामकाज सुरळीत ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.
महसूल विभागातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
कार्यशाळेत गाव नमुना क्रमांक १ ते ८ ऑनलाइन अद्ययावत करणे, ई-फेरफार प्रणालीतील प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) मंजुरी पूर्ण करणे, ओडीसी अहवालातील प्रलंबित बाबींची पूर्तता करणे आणि ई-पीक पाहणीतील प्लॉट मंजुरीची कामे पूर्ण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या कामांमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलतेने काम करून नागरिकांच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत ऑनलाइन महसूल कामकाजातील अडचणी, आधुनिक तांत्रिक सुविधांचा प्रभावी वापर आणि गावपातळीवरील शासकीय सेवा अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित