खुलताबाद पोलिसांची तत्परता; उत्तर प्रदेशातील महिलेची हरवलेली पर्स CCTVच्या मदतीने शोधून केली परत
खुलताबाद दि १६ :- श्री घृष्णेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील महिलेची सुमारे ₹६० हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि ₹४ हजार रोख रक्कम असलेली हरवलेली पर्स खुलताबाद पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे शोधून काढत सुरक्षितपणे संबंधित महिलेकडे सुपूर्द केली.
श्रीमती दयावती राजकुमार वर्मा (वय ३६), रा. अमरगड, झाशी, उत्तर प्रदेश या १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सिटी बसने वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांची पर्स बसमध्येच अनावधानाने राहिली. या पर्समध्ये ₹४ हजार रोख रक्कम तसेच अंदाजे ₹६० हजार किमतीचे सोन्याचे दागिने, त्यात मंगळसूत्राचा समावेश होता.
पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर दयावती वर्मा यांनी तातडीने खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपास सुरू केला.
पोलिसांनी विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. दिवसभर सातत्याने तपास केल्यानंतर ही पर्स कसाबखेडा येथील गोविंद शर्मा यांना मिळाल्याची माहिती पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्यांच्याकडून ₹४ हजार रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असलेली पर्स हस्तगत केली.
पोलिसांनी ही पर्स कोणतीही वस्तू कमी न होता दयावती राजकुमार वर्मा यांच्या स्वाधीन केली. मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम परत मिळाल्याने दयावती वर्मा यांनी खुलताबाद पोलिसांचे मनापासून आभार मानले.
दयावती वर्मा या टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळणे त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरला.
पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे नागरिकांच्या अडचणीच्या प्रसंगी पोलीस यंत्रणा किती वेगाने मदतीला धावून येऊ शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.
“नागरिकांचा विश्वास — हीच पोलिसांची खरी ताकद!”
उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बोडखे, सहाय्यक फौजदार आव्हाड आणि पोलीस अंमलदार ठोंबरे यांनी केली.
महाराष्ट्र वाणी