क्षणाचाही विलंब नाही! पाचोऱ्यातील विद्यार्थ्यांनी मोबाईल परत करून जिंकली सर्वांची मने
विद्यार्थ्यांच्या कृतीचे तहसीलदार व पोलिसांकडून कौतुक
महाराष्ट्र वाणी
पाचोरा – जळगाव | दि. १६ :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज प्रामाणिकपणाचा एक प्रेरणादायी प्रसंग घडला. दुपारच्या जेवणानंतरच्या सुटीत अँग्लो उर्दू हायस्कूल, पाचोरा येथील विद्यार्थी हुजैफा शेख खलील आणि अरबाज जाकीर मनियार हे शाळेत परतत असताना त्यांना रस्त्यावर एक मोबाईल फोन सापडला.
क्षणाचाही विलंब न करता विद्यार्थ्यांनी तो मोबाईल फोन उचलून आपले शिक्षक अजहर खान सर यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शोएब अहमद सर तसेच सर्व शिक्षकवर्ग स्टाफ रूममध्ये उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक कृतीचे सर्व शिक्षकांनी मनापासून कौतुक केले.
दरम्यान मोबाईल फोनच्या मालकाचा कॉल आल्यानंतर, फोन सुरक्षित असल्याची माहिती स्टाफ रूममधून देण्यात आली. काही वेळातच मोबाईल फोनचा मालक शाळेत पोहोचला आणि विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्याचा मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाला.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाची, संस्कारांची व चांगल्या वर्तनाची चर्चा पाचोरा शहरात वेगाने पसरली. ही माहिती मिळताच पाचोऱ्याचे तहसीलदार विजय बनसोडे व पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून विशेष सन्मान केला.
यावेळी पोलीस निरीक्षक राहुल पवार म्हणाले की, “आजच्या काळात असे प्रामाणिकपणाचे उदाहरण फारच दुर्मिळ आहे.” तर तहसीलदार विजय बनसोडे यांनी विद्यार्थ्यांच्या या कृतीमागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे संस्कार व मूल्याधिष्ठित शिक्षण असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले.
तहसीलदार साहेबांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही सत्य व प्रामाणिकपणाच्या मार्गावर ठाम राहण्याचा संदेश दिला. यावेळी वर्गशिक्षक अजहर खान, रेहान खान तसेच पालकांचेही अभिनंदन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला.
या कार्यक्रमास सलमान शेख, जावेद रहीम, शकील सय्यद व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगातून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, प्रामाणिकपणा आणि चांगली मूल्ये आजही समाजात जिवंत आहेत.
🔹 चांगली मूल्येच उज्ज्वल भविष्यास दिशा देतात!