कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी प्रल्हाद सोनवणे यांची नियुक्ती; रमेशदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
जळगाव वि १८ :- आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सोनवणे यांची कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील आणि युवा प्रदेशाध्यक्ष अॅड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त लोणावळा येथे कोळी महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय विशेष विचारविनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सोनवणे यांच्यासह जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी हरिलाल कोळी, पश्चिम जिल्हाध्यक्षपदी संदीप कोळी आणि महानगराध्यक्षपदी भगवान सोनवणे यांचीही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
प्रल्हाद सोनवणे यांनी आदिवासी कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी विविध सामाजिक उपक्रम, आंदोलने, मोर्चे, उपोषणे आणि समाज अधिवेशनांच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विशेषतः अनुसूचित जमातीतील कोळी समाजातील विद्यार्थी, महिला आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
समाजातील प्रलंबित प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविणे, शासकीय योजनांचा लाभ समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहोचविणे तसेच समाजाची एकजूट आणि संघटनशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी विविध स्तरांवर काम केले आहे. ते रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष असून भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या माध्यमातूनही सामाजिक प्रश्नांवर कार्यरत आहेत.
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत कोळी समाजाच्या संघटनात्मक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोळी महासंघाने त्यांच्यावर खान्देश विभागाची जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडे, सरचिटणीस राजहंस टपके, प्रदेश नेते सतीश धडे, देवानंद भोईर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटकर, जळगाव जिल्हा प्रभारी जितेंद्र सपकाळे, सिद्धेश्वर कोळी, शानाभाऊ सोनवणे, डी.एम. कोळी, युवराज सैंदाणे, सुभाष सोनवणे, नितीन कांडेलकर, देविदास कोळी, बबलू कोळी यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सोनवणे यांच्या नियुक्तीमुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, भुसावळ आणि अहिल्यानगर परिसरातील कोळी समाजात उत्साहाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खान्देशात संघटनात्मक विस्ताराला गती देणार
खान्देश विभागातील कोळी समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, समाजातील युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडणे तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, याला प्राधान्य दिले जाईल. महासंघाच्या माध्यमातून नव्या जोमाने काम करण्याचा विश्वास प्रल्हाद सोनवणे यांनी व्यक्त केला.