कमर्शियल गॅस टंचाईचा फटका; छत्रपती संभाजीनगरात हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक

कमर्शियल गॅस टंचाईचा फटका; छत्रपती संभाजीनगरात हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- शहरात निर्माण झालेल्या कमर्शियल गॅस टंचाईचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक हॉटेलमधील गॅस सिलिंडरचा साठा संपल्याने हॉटेल चालकांना अक्षरशः चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण देण्याची वेळ आली आहे.

शहरातील अनेक लहान-मोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणारा कमर्शियल गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही ठिकाणी सिलिंडर मिळण्यात उशीर होत असल्याने हॉटेल चालकांनी पर्याय म्हणून पारंपरिक चुलीचा आधार घेतला आहे. लाकूड किंवा कोळशाच्या चुलीवर भाजी, भात आणि इतर पदार्थ तयार करून ग्राहकांची सेवा सुरू ठेवली जात आहे.

हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा ग्राहकांची गैरसोय होऊ नये आणि व्यवसायही सुरू राहावा, या उद्देशाने हॉटेल चालकांनी हा मार्ग स्वीकारला आहे. मात्र चुलीवर स्वयंपाक करणे वेळखाऊ आणि कष्टाचे असल्याने स्वयंपाक व्यवस्थापनात मोठ्या अडचणी येत असल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.

विशेषतः मोठ्या हॉटेलमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात अन्न तयार करावे लागते. त्यामुळे गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करणे अत्यंत कठीण ठरत असून कर्मचारी वर्गालाही अधिक श्रम करावे लागत आहेत. यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कमर्शियल गॅसचा पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास हॉटेल व्यवसायावर आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा नियमित करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.

— गॅस टंचाईवर लवकर तोडगा निघेल का? याकडे आता हॉटेल व्यावसायिकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.