कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर; ८६ हजार कोटींच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या शिष्टमंडळाची रामगिरी बंगल्यावर भेट; GST आणि २५१५ निधीबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर; ८६ हजार कोटींच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित!
कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर; ८६ हजार कोटींच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित!

मुंबई दि २४ :- महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेच्या वतीने राज्यातील सुबेदार अभियंते व ओपन कंत्राटदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी बंगल्यावर सविस्तर भेट घेण्यात आली. राज्य अध्यक्ष इंजि. मिलिंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीत राज्य अभियंता संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिपेश कोलुरवार यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुमारे १५ ते २० मिनिटे विविध मागण्यांवर चर्चा झाली. दोन्ही संघटनांच्या वतीने तीन पानी निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी निवेदनातील सर्व मागण्या सविस्तर वाचून प्रत्येक मुद्द्यावर चर्चा केली.

८६ हजार कोटींच्या प्रलंबित देयकांचा मुद्दा ऐरणीवर

जलजीवन मिशन, २५१५, आदिवासी विभाग, पर्यटन विभाग आणि सामाजिक विभागाशी संबंधित कंत्राटदारांची सुमारे ८६ हजार कोटी रुपयांची देयके प्रलंबित असल्याचा गंभीर मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला. या मोठ्या थकबाकीबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यानंतर त्यांनी संघटनांच्या इतर मागण्यांवरही सकारात्मक चर्चा केली.

प्रलंबित प्रश्नांवर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असून कंत्राटदारांनी काही काळ संयम राखावा आणि त्यांच्या माध्यमातून कंत्राटदारांना विश्वास द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

GST आणि २५१५ निधीबाबत सकारात्मक संकेत

२५१५ निधीच्या प्रश्नासंदर्भात मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच GST संदर्भातील नियम पूर्वीप्रमाणे करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

यावेळी शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिवाळीपूर्वी मुंबई मंत्रालयात संघटनेसोबत बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनीही संघटनेच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

जलजीवन मिशन, आदिवासी व पर्यटन विभागाबाबतही आशावाद

संघटना शासनाच्या विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे लक्षात घेऊन जलजीवन मिशन, आदिवासी विभाग आणि पर्यटन विभागाशी संबंधित प्रश्नांवरही सकारात्मक निर्णय होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. सरकार संघटनांसोबत कायम सकारात्मक असून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पुढील काळात प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे राज्यातील कंत्राटदार आणि अभियंत्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी रोहित देशमुख, जिल्हाध्यक्ष सचेत कोठारे, सचिव तसेच दोन्ही संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील हजारो कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची देयके प्रलंबित असताना मुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात असून, आता शासनाकडून प्रत्यक्ष निधी वितरण आणि निर्णयांची अंमलबजावणी कधी होते, याकडे कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित