“एकही नगरसेवक अपात्र झाला तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही” – इम्तियाज जलीलांचा इशारा;

महापालिकेच्या ‘गैरकारभाराचा बॉम्ब’ फोडण्याचा दावा

“एकही नगरसेवक अपात्र झाला तर अधिकाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही” – इम्तियाज जलीलांचा इशारा;

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ६ :- शहागंज परिसरातील अतिक्रमण कारवाईच्या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या १३ नगरसेवकांवर गुन्हे दाखल करून अपात्रतेची प्रक्रिया सुरू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईवर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिका प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “माझ्या एकाही नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई झाली तर अधिकाऱ्यांनाही स्वस्थ बसू देणार नाही. प्रशासनाच्या अनेक कारनाम्यांचा कच्चा चिठ्ठा आमच्याकडे असून लवकरच मोठा खुलासा करणार,” असा इशारा त्यांनी दिला.

शहरातील शहागंज भागात काही हॉकर्सकडून एका महिला व तिच्या पतीला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अतिक्रमण हटाव पथकाच्या कारवाईला विरोध केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या १३ नगरसेवकांवर कारवाई सुरू केली आहे. उपायुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले असून, महापालिका अधिनियम कलम १०(ड)(१) अंतर्गत नगरसेवकांना अपात्र करण्याबाबत नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे.

यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, काही लोकांच्या चुकीसाठी सर्व हॉकर्सना दोषी धरणे योग्य नाही. “माझ्या नगरसेवकांना मतदारांनी घरात बसण्यासाठी नव्हे तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी निवडून दिले आहे. जे नगरसेवक घटनास्थळी उपस्थितही नव्हते, त्यांची नावे कोणाच्या दबावाखाली गुन्ह्यात घातली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक शहरात केंद्र सरकारच्या नियमानुसार हॉकर्स झोन असणे बंधनकारक आहे. “हॉकर्सना व्यवसायासाठी जागा दिली जात नाही, त्यांच्याकडून हप्ते घेतले जातात आणि वर कारवाईही केली जाते, हे योग्य नाही. आधी हॉकर्स झोन तयार करा आणि त्यानंतर नियम मोडल्यास कारवाई करा,” अशी मागणी त्यांनी केली.

रमजानसारख्या सणासुदीच्या काळात छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर टीका केली. “रमजान, दिवाळी अशा सणांमध्ये छोट्या व्यावसायिकांना दोन पैसे कमावण्याची संधी मिळते. अशा वेळी कारवाईच्या नावाखाली त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही,” असेही ते म्हणाले.

दरम्यान, काही नगरसेवक घटनास्थळी नसतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत जलील यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले. “तुम्ही कारवाई करा, आम्ही ती न्यायालयात चुकीची ठरवू,” असे ते म्हणाले.

एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये अनेक तरुण असल्याने त्यांना संयम राखून कायद्याच्या चौकटीत काम करण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले. “काही तरुण नगरसेवक रिल्सच्या मोहात अडकतात, त्यामुळे अडचणी वाढतात. त्यांनाही समज दिली आहे,” असे जलील यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ३३ नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमसमोर या प्रकरणामुळे राजकीय आव्हान उभे राहिले असून, पुढील काही दिवसांत या वादाला अधिक रंग चढण्याची शक्यता आहे.

— आता जलील यांच्या ‘मोठ्या खुलाशा’कडे शहराच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.