आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी NSUI चे उलगुलान आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
✍️ महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक मागण्यांसाठी आज नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) ने आक्रमक भूमिका घेतली. शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विद्यार्थ्यांनी भव्य उलगुलान आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात भेडसावणाऱ्या गंभीर अडचणी, शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष आणि रखडलेल्या योजनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती न मिळणे, शासकीय वसतिगृहांमधील अपुऱ्या सुविधा, प्रवेश प्रक्रियेतील विलंब, तसेच शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीचा प्रश्न प्रलंबित राहणे या मुद्द्यांवर आंदोलन केंद्रित होते.
यावेळी NSUI कडून काही ठोस मागण्या मांडण्यात आल्या, त्यामध्ये—
आदिवासी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तातडीने वितरित करावी
शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती त्वरित मंजूर करून अदा करावी
शासकीय वसतिगृहातील मूलभूत सुविधा सुधाराव्यात
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करावा
या मागण्यांचे निवेदन NSUI च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.
शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ निर्णय न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा NSUI पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनात NSUI चे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.