आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा-आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा

आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा-आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके
आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा-आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१३ :- आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांनी आज प्रधानमंत्री जनमन योजना व प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, आदिंसह आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. आदिवासी विकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने करा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीला खासदार संदिपान भुमरे, आमदार भीमराव केराम, आमदार संजना जाधव, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे आदी बैठकस्थळी तर दुरदृष्यप्रणालीद्वारे विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. 

यावेळी प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान योजना, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, वनहक्क दावे याबाबतचा सविस्तर आढावा घेत आदिवासी विकास मंत्री डॉ.उईके म्हणाले, देशातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. देशातील आदिवासी भागांमध्ये सेवा व पायाभूत सुविधा देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आदिवासी बांधवांना शेवटच्या घटकापर्यंत विविध योजनांचा लाभ पोहचविण्यासाठी गावनिहाय नियोजन करा. आदिवासी गावपाड्यांमधील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर कायम विभागाचे लक्ष असणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासोबतच एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. आदिवासी आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निवास, भोजन, शिक्षण, शिष्यवृत्ती योजना व अन्य मुलभूत सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यत पोहचावाव यासाठी नियोजनपूर्वक या योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच शबरी आदिवासी घरकुल योजना, धरती आबा जनजाती उन्नत ग्राम अभियानांतर्गत विभागात राबविण्यात आलेल्या कॅम्पेनचा त्यांनी आढावा घेतला. 

केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदि कर्मयोगी राज्यस्तरीय प्रशिक्षण राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नविन विचार व नव्या संकल्पना घेऊन काम करावे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आपल्या विभागातील गावनिहाय लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचविण्याचे काम आपण सर्वजण निश्चित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

जिल्हाधिकारी श्री.स्वामी यांनी जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या गावनिहाय शिबीराबाबत तसेच या शिबीराच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लाभाबाबत माहिती दिली. शबरी आवास योजनेतील घरकुल स्थितीबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच विभागातील जिल्हानिहाय, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 

जिल्हा प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत माहिती दिली. 

*शासकीय आश्रमशाळा वडनेर व सुरूडी येथील नुतन शालेय इमारतींचे लोकार्पण*

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शासकीय आश्रमशाळा वडनेर ता.कन्नड व शासकीय आश्रमशाळा सुरूडी येथील नुतन शालेय इमारतीचे आभासी पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. या शाळेच्या माध्यमातून या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सर्व आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ.उईके यांनी दिले. 

*रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन*

विभागीय आयुक्त कार्यालयात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सहभागाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री डॉ.उईके यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात पोषणमुल्यांनी भरलेल्या अनेक रानभाज्यांची माहिती देण्यात आली.