अनेक वर्षांपासून पाण्याविना पडून असलेल्या टाकीसाठी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील मैदानात; उपोषणकर्त्यांची घेतली भेट!
शेंद्रा कमंगर येथील गट क्र. ५८ मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सुरू करण्याच्या सूचना
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २५ :- गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांची प्रशासनाने दखल घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी शेंद्रा कमंगर येथील पाणीप्रश्नी पुढाकार घेतला आहे.
शेंद्रा कमंगर (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गट क्रमांक ५८ मध्ये सार्वजनिक पाण्याच्या टाकीचे काम अनेक वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण होऊनही अद्याप या टाकीत पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेली पाण्याची टाकी वापराविना पडून असून, नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील नागरिक श्री. शेख आमीन हे मागील काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी आज प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देत शेख आमीन यांची विचारपूस केली. तसेच, पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी तांगडे पाटील यांनी केवळ उपोषणकर्त्यांची भेट घेऊन समाधान न मानता, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांशी तत्काळ दूरध्वनीवरून संपर्क साधला. गट क्रमांक ५८ मधील सार्वजनिक पाण्याच्या टाकीत लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
अनेक वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेचा लाभ अद्याप नागरिकांना मिळत नसेल, तर ही बाब निश्चितच गंभीर आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाने दुर्लक्ष करू नये. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, त्यासाठी त्यांना उपोषण करण्याची वेळ येणे ही चिंतेची बाब आहे.
नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि न्याय्य मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत, अशी भूमिका पांडुरंग तांगडे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
आता संबंधित प्रशासन या सूचनांची कितपत गांभीर्याने दखल घेते आणि अनेक वर्षांपासून बंद असलेला पाणीपुरवठा प्रत्यक्षात कधी सुरू होतो, याकडे शेंद्रा कमंगर येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित