अखेर निवडणूक रणसंग्राम! राज्यात १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

अखेर निवडणूक रणसंग्राम! राज्यात १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १३ :- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला असून, उर्वरित निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून राहणार आहेत.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यांच्या माहितीनुसार १६ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी होणार असून, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडणार आहे.

इच्छुक उमेदवारांना १६ ते २१ जानेवारीदरम्यान ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी २२ जानेवारीला, तर २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण ७३१ जिल्हा परिषद सदस्य, तर १२५ पंचायत समित्यांमधील १,४६२ जागांसाठी मतदान होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्यास मुदतवाढ दिल्याने आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत असताना महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. आता न्यायालयाच्या मोकळीकमुळे आयोगाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निर्णय २१ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर अवलंबून राहणार आहे. आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा निकाली निघेपर्यंत त्या निवडणुकांवर बंधने कायम राहणार आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम (२०२६)

🗓️ उमेदवारी अर्ज भरणे: १६ ते २१ जानेवारी

🔍 अर्ज छाननी: २२ जानेवारी

🔙 अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत)

🗳️ अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २७ जानेवारी (दुपारी ३.३० नंतर)

🗳️ मतदान: ५ फेब्रुवारी (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०)

📊 मतमोजणी: ७ फेब्रुवारी (सकाळी १० वाजेपासून)

👉 राज्यातील ग्रामीण सत्तेचा किल्ला कोण जिंकणार, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे!