सुसंस्कारीत विद्यार्थी घडविण्यात पालकांनी सहयोग द्यावा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
शालेय विद्यार्थी पालक सभा
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.२८ :- शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. मात्र सुसंस्कारीत भावी नागरिक आपण शिक्षणाद्वारे घडवित असतो. हा नागरिक घडविण्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत पालकांचा सहयोग मोलाचा आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले.
खुलताबाद पंचायत समिती सभागृहात शालेय विद्यार्थी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार स्वरुप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, गट शिक्षणाधिकारी सचिन वाघ, विलास केवट आदी यावेळी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित पालकांना उद्देशून म्हणाले की, सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दशसूत्री नावाचा उपक्रम सुरु केला आहे. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षण देतांना शिक्षकांनी राबवाव्याच्या उपक्रमांविषयी दिशा निर्देश देण्यात आले आहेत. आपल्याला शैक्षणिक गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवितांना हा विद्यार्थी भावी नागरिक आहे. त्यादृष्टीने त्याची जडणघडण करावयाची आहे. त्यासाठी त्याच्या आहार विहारापासून त्याचेवर संस्कार करणे आवश्यक आहे. असे असतांना पालकांनी स्वतः त्यात आपले योगदान देणे आवश्यक आहे. पालकांच्या सहभागाशिवाय असे सुसंस्कारित भावी नागरिक घडविणे अशक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
मुलांना तंत्रस्नेही बनविणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडविणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडविणे, अशा विविध उद्दिष्टांसाठी हे दशसूत्री अभियान राबविण्यात येत आहे,असे त्यांनी सांगितले व पालकांनी आपल्या पाल्यांवर संस्कार करण्यासाठी शिक्षकांच्या प्रयत्नांना साथ द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.