सुमित खांबेकर शिंदे गटात;तर शहराध्यक्ष गजन गौडा पाटील सहकाऱ्यांसह भाजपात! ठाकरे बंधू एकत्र येऊनही मनसे–ठाकरे सेनेला गळती, राजकीय वर्तुळात चर्चांचा भडका
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ :- पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असल्याने विरोधी राजकारणाला नवी दिशा मिळेल, अशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांतून महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची गळती सुरू असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी मनसेला मोठा धक्का देत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मनसेसाठी हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.
या प्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी नव्याने प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत, “शिवसेना ही विकासाची आणि सामान्य जनतेची ताकद आहे” असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे केवळ मनसेच नव्हे, तर कोल्हापूर आणि नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही मोठे धक्के बसले आहेत. छत्रपती संभाजीनगरचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर मनसेचे सुरडकर आणि गौडा पाटील हेही भाजपमध्ये गेल्याने मनसेची संघटनात्मक ताकद हादरल्याचे चित्र आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असताना, त्यांच्या पक्षांतील जिल्हा, शहर आणि महानगर पातळीवरील प्रमुख नेते मात्र वेगवेगळ्या पक्षांत जात असल्याने एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे—
👉 दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांना ही गळती का लागली?
👉 स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते नेतृत्वावर नाराज आहेत का?
👉 सत्ताधारी भाजप-शिवसेनेची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होत आहे का?
या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे थेट परिणाम दिसण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
👉 निवडणूक रणसंग्रामाच्या आधीच सुरू झालेली ही पक्षांतरांची लढाई, महाराष्ट्राच्या राजकारणाला नेमकी कोणती दिशा देणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.