सिल्लोड- सोयगाव मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना गती; विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :- सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सिंचन व्यवस्थेला बळकटी मिळावी तसेच प्रलंबित प्रस्ताव व नवीन प्रकल्पांना वेग देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गोदावरी पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवनात जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार उपस्थित होते.
या बैठकीत पूर्णा नदीवर साखळी बंधारे उभारणी, अजिंठा येथे अप्पर तहसिल कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देणे, नवीन अजिंठा धरणाला प्रशासकीय मान्यता, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, सोयगाव प्रकल्पातून जंगलात तांडा प्रकल्पाकडे कालव्याद्वारे पाणी सोडणे यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीदरम्यान ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्व प्रस्तावांना तातडीने मान्यता देत सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. सिल्लोड- सोयगाव मतदारसंघाच्या विविध प्रश्नांवर बैठक घेऊन त्वरित निर्णय केल्याबद्दल उपस्थितांनी जलसंपदा मंत्री यांचे आभार मानले.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे सचिव संजय बेलसरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव (वित्त) प्रतिनिधी विजय शिंदे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद कुलकर्णी, गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता सुनंदा जगताप, अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भारत सिंगारे आदी अधिकारी उपस्थित होते.