“शेतकऱ्यांना 'फुकट मागू नका' असं सांगणारे अजित पवार अंबानी-अदानींना उपदेश करणार का? एस एम देशमुख
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १ :- राज्यातील शेतकऱ्यांना उद्देशून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले विधान – “शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज फेडायची सवय लावावी… सारखं सारखं फुकट कसं मिळेल?” – हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, या वक्तव्यामागे अनेक विसंगती असल्याचं निरीक्षण अखील भारतीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.
देशमुख यांनी म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील शेतकरी गरीब असला तरी तो स्वाभिमानी आहे. कोणाची कवडी बुडवायची नाही हे त्याला वंशपरंपरेने माहित आहे. लाचारी आणि चापलुसी या गोष्टी शेतकऱ्यांना जमत नाहीत. मग ‘फुकट मिळेल’ असं म्हणण्याचं धाडस कोणतं?”
ते पुढे म्हणाले, “कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांनी नव्हे, तर भाजपने स्वतःहून आपल्या जाहीरनाम्यात केली होती. ‘सातबारा कोरा’ करण्याचं आश्वासन भाजपने दिलं होतं. शेतकऱ्यांनी फक्त त्या शब्दाची आठवण करून दिली. कर्जमाफी म्हणजे फुकट नव्हे, तर दिलेलं वचन पाळा एवढीच मागणी होती.”
देशमुख यांनी भाजपच्या “लाडकी बहिण योजना”वरही थेट टीका केली. “ही योजना बहिणींसाठी नव्हे तर मतांसाठी आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधीच या योजना सुरू केल्या जातात. निवडणुकीचं राजकारण ‘कर्जमाफी’ आणि ‘भत्ते’च्या चॉकलेटवर चालतंय,” असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “शेतकरी कर्जमाफी हा विषय मुद्दाम पुढे करून खरी मागणी — म्हणजेच प्रा. एम.एस. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी — दडपली जाते. सरकारनं उत्पादन खर्चाच्या ५० टक्के नफ्याच्या हमीभावाची अंमलबजावणी केली तर शेतकरी आपोआप कर्जमुक्त होतील.”
देशमुख यांचा सवाल ठळक आहे — “शेतकऱ्यांना ‘फुकट मागू नका’ असं सांगणारे अजित पवार साहेब, उद्योगपतींना, अंबानी-अदानींना उपदेश करणार का? राज्याची तिजोरी रिकामी करून लोकांना उपकाराच्या ओझ्याखाली ठेवणं थांबवा!”
ते शेवटी म्हणाले — “शेतकरी काही फुकट मागत नाहीत. पण तुम्ही देणार असाल तर त्याने नाकारायचं कारण नाही. फक्त शेतकऱ्यांना नाही, स्वतःच्या राजकीय स्वार्थालाही थोडा उपदेश द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे.”
🟢 महाराष्ट्र वाणी ✍️
"बोलक्या मातीचा आवाज!"