"शेतकरी कर्जात बुडाला आणि ‘वर्षा’वर ४० लाखांचा खर्च – रोहित पवारांचा सरकारला सवाल"
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १८ :- राज्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पिकांचं नुकसान, कर्जाचा बोजा आणि मदतीची प्रतीक्षा अशा अवस्थेत असताना, राज्य सरकारकडे निधीअभावी मदत आणि कर्जमाफी थांबलेली असल्याचं दिसत आहे. दरम्यान, राज्यावरचं कर्ज तब्बल ९.५ लाख कोटी रुपयांच्या वर गेलेलं आहे.
अशा गंभीर परिस्थितीत, मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’वर दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये डबल बेड मॅट्रेस आणि सोफासाठी २०.४७ लाख, तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचं दस्तावेजात नमूद आहे.
या खर्चावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी यावर ठाम भूमिका मांडली आहे. ते म्हणाले
“शेतकरी संकटात असताना आणि राज्यावर प्रचंड कर्ज असताना, इतका मोठा खर्च करणे योग्य ठरेल का? मंत्र्यांच्या घरांची देखभाल आवश्यक आहे, पण त्यासाठी वेळ आणि परिस्थितीचा ताळमेळ असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.”
ते पुढे म्हणाले की, “अशा निर्णयांमुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो. सरकारने प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे, अन्यथा ‘रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता’ अशीच परिस्थिती महाराष्ट्रात होईल.”
या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, जनतेच्या पैशांचा वापर हा खरंच योग्य पद्धतीने होत आहे का, हा प्रश्न अधिक गंभीरपणे पुढे येऊ लागला आहे.
👉 शेतकरी संकटात असताना ‘वर्षा’वरील ऐशोआरामी दुरुस्तीचा खर्च – हा विरोधाभास सरकारने गांभीर्याने घ्यायला हवा.