"शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवक- महिलांचे संघटन करा" – आमदार अब्दुल सत्तार यांचे आवाहन

"शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवक- महिलांचे संघटन करा" – आमदार अब्दुल सत्तार यांचे आवाहन

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड (प्रतिनिधी) दि९ जून :– शिवसेनेच्या ‘शिवकार्य अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेचा आढावा घेण्यासाठी आज सिल्लोड येथील आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयात (सेना भवन) बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा सर्वत्र फडकवायचा आहे. यासाठी युवक आणि महिलांचे मजबूत संघटन ही काळाची गरज आहे."

ते पुढे म्हणाले, "गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हा उपक्रम प्रभावीपणे राबवला पाहिजे. सिल्लोड - सोयगाव मतदारसंघातून सर्वाधिक सदस्य नोंदणी ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपापली जबाबदारी समजून घेऊन सक्रिय योगदान द्यावे."

बैठकीदरम्यान विविध पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसंदर्भातील आपले अनुभव आणि यशस्वी उदाहरणे मांडली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, घरोघरी संपर्क मोहिम आणि युवकांमध्ये शिवसेनेचा विचार रुजवण्यासाठी विशेष अभियान राबवण्याचे ठरवण्यात आले.

यावेळी विविध विभागांतील शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्या, युवा सेना कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.