शहरात प्रवेशबंदीचे उल्लंघन! २५९ जड वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई – तब्बल ₹२.७१ लाखांचा दंड आकारला

शहरात प्रवेशबंदीचे उल्लंघन! २५९ जड वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई – तब्बल ₹२.७१ लाखांचा दंड आकारला
शहरात प्रवेशबंदीचे उल्लंघन! २५९ जड वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई – तब्बल ₹२.७१ लाखांचा दंड आकारला

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :– शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि वाहतूक कोंडी तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून अनेक वाहनचालक शहरात चोरून प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहतूक विभागाच्या सर्व पाच शाखांनी विशेष मोहिम राबवली. या मोहिमेदरम्यान प्रवेशबंदी कालावधीत शहरात आलेल्या २५९ जड वाहनचालकांवर कारवाई करत तब्बल ₹२,७१,५०० चा दंड ठोठावला. यापैकी ₹५९,८५० इतका दंड तातडीने वसूल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ आणि उपआयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक अमोल देवकर, राजेश यादव, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, सचिन मिरधे आदी अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, पुढेही प्रवेशबंदी व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमित कारवाई सुरू राहील. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहन चालविताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत व वाहतूक नियमांचे पालन करून शहराच्या सुरळीत वाहतुकीस सहकार्य करावे.