विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर, दि.१० :- पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यक्षेत्रात विमानतळाच्या आजुबाजुच्या परिसरात असणारे फार्म हाउस, मंगल कार्यालय येथील विवाह सोहळा तसेच अन्य सामाजिक कार्यक्रमामध्ये लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर दि.८ नोव्हेंबर २०२५पर्यंतच्या कालावधीसाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी निर्गमित केले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व फार्म हाऊस, मंगल कार्यालय, विवाह सोहळा, सामाजिक कार्यक्रम इ. च्या आयोजक, मालक यांनी लेझर लाईट्स, बीम लाईट्स याचा वापर करु नये. कारण अशा वापर केल्यामुळे पायलटच्या दृष्यात अडथळा निर्माण होऊन लॅंडीग व टेकऑफ करण्यापूर्वी लक्ष विचलित होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.