विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळामध्ये सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शालेय क्रीडा स्पर्धा 2025- 26 मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळामध्ये सहभाग आवश्यक -  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळामध्ये सहभाग आवश्यक -  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.२६ जुलै :- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत. शालेय शिक्षणासोबत खेळामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयात क्रीडा विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.  

जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, तालुका क्रीडा अधिकारी सोयगाव मुकूंद वाडकर, जिल्हा क्रीडा परिषद सदस्य श्रीमती सुजाता गुल्हाणे, डॉ. रेखा परदेशी, खंडू यादवराव, राम मायंदे आणि क्रीडा मार्गदर्शक श्रीमती पुनम नवगिरे,पोलीस निरीक्षक एस.एस. देशमुख, डी.टी. शिरसाट, विस्तार अधिकारी, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी डॉ. उदय डोंगरे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटना सचिव गोकुळ तांदळे, प्रपित मोघे बँक ऑफ महाराष्ट्र, लिड बँक श्रीमती शिल्पा मोरे, तुषार आहेर उपस्थित होते.         

जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत एक तासाचे व्याख्यान आयोजित करून खेळ आणि खेळाचे महत्त्व पटवून द्यावे. खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि योजना प्रत्येक खेळाडूपर्यंत पोहोचवावे. तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये शाळांनी सहभागी होणे अनिवार्य करावे. यासंदर्भात सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांना पत्र देण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांचा क्रीडा सहभाग वाढेल. मुलामध्ये विविध प्रकारच्या खेळातील प्राविण्य वाढीस लागून राज्यस्तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शिक्षण व क्रीडा विभागाने काम करावे, असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष दिलीप स्वामी यांच्या हस्ते शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या मार्गदर्शक पुस्तिकेमुळे आगामी शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन आणि अंमलबजावणी सुलभ होण्यास मदत होईल, असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला

.