'लाडकी'ला कर्ज नाय! – अजितदादांची घोषणा हवेत, आदिती तटकरे म्हणतात "अजेंड्यावरच नाही"

महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ४ जुलै :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मे महिन्यात "लाडकी बहीण" योजनेतील महिलांना ३०-४० हजारांचे कर्ज देणार असल्याची ग्वाही दिली होती. या कर्जातून महिलांना छोटा व्यवसाय सुरू करता यावा, त्यासाठी सहकारी बँकांच्या मदतीने योजना राबवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घोषणेला दुजोरा दिला होता. पण आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत थेट सांगितलंय की, अशा कोणत्याही कर्जयोजनेचा विचार सरकार करत नाही!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना तटकरे यांनी सांगितलं की, लाडकी बहीण योजनेत केवळ दरमह १५०० रुपये थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात दिले जातील. या योजनेसाठी २०२५-२६ साली तब्बल ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, १५०० रुपयांचा हप्ता वाढवून २१०० करण्याचा कोणताही उल्लेख त्यांच्या उत्तरात नाही.
विशेष म्हणजे, या योजनेत २२८९ सरकारी महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश झाला होता. मात्र, त्या अपात्र असल्याचे स्पष्ट करून त्यांना वगळण्यात आलं असल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
म्हणजे अजितदादांची 'घोषणा' फक्त भाषणापुरतीच?
महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी मुखेड येथे महिलांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देण्याची योजना जाहीर केली होती. पण त्याचा आता कोणताही उल्लेख सत्ताधारी मंत्री करत नसल्याने, सरकारची भूमिका बदलली का? की ही घोषणा फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा होती? असे सवाल जनतेत उपस्थित होऊ लागले आहेत.
✍️ – महाराष्ट्र वाणी | बातमी आपल्याशी थेट!