लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये वाढ तातडीने नाही; CM फडणवीसांचे स्पष्ट संकेत – “योग्य वेळी योग्य निर्णय”

Ladaki Bahin Yojana Update : महाराष्ट्र वाणी 

नागपुर (प्रतीनीधी) दि ८ :- महाराष्ट्र शासनाची ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरु होऊन वर्ष पूर्ण झाले असले, तरी महिलांना अपेक्षित असलेली आर्थिक मदत 1500 रुपयांवरच स्थिर आहे. निवडणुकीदरम्यान 2100 रुपये प्रतिमहिना देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या वाढीव रकमेची अंमलबजावणी कधी होणार? हा प्रश्न सातत्याने चर्चेत होता.

याचदरम्यान नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना स्पष्ट उत्तर दिले. विरोधकांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत सरकारवर शेतकरी संकट, बेरोजगारी आणि महिला सुरक्षेबाबत अपयशाचे आरोप केले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला "निराशेने भरलेली" अशी प्रतिक्रीया दिली.

लाडकी बहीण योजनेतील वाढीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले,

“योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ… काळजी करू नका.”

त्यांच्या या वक्तव्यामुळे हिवाळी अधिवेशनात 2100 रुपये प्रतिमहिना लाभ मिळण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे सध्या 1500 रुपयांचे विद्यमान अनुदानच सुरू राहणार, हे स्पष्ट झाले आहे.

तथापि, या योजनेची लोकप्रियता आणि महिलांमधील नाराजी लक्षात घेता आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार वाढीचा निर्णय घेऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

 “वाचा, समजा आणि शेअर करा… महाराष्ट्र वाणीसोबत राहा अपडेटेड!”