‘लाडकी बहीण’ घोटाळा उघड! ८ हजार शासकीय कर्मचारी लाभार्थी ठरले; तब्बल १५ कोटी परत वसुलीची कारवाई
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २६ :- ‘लाडकी बहीण’ या लोकप्रिय योजनेत मोठा घोटाळा समोर आला आहे. पात्रतेबाहेर असलेले तब्बल ८ हजार सरकारी कर्मचारी या योजनेचे लाभार्थी ठरले आहेत. महिला व बालकल्याण विभागाने घेतलेल्या आढाव्यानंतर वित्त विभागाने तातडीने या सर्वांकडून १५ कोटी रुपयांच्या घरातील रक्कम परत वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही होणार आहे.
नियमांकडे दुर्लक्ष, कर्मचाऱ्यांकडून शासनाची फसवणूक
या योजनेचा लाभ फक्त वार्षिक उत्पन्न २.५ लाखांखालील महिलांनाच मिळू शकतो, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ घेता येणार नाही, असे स्पष्ट आदेश असतानाही अनेक कर्मचारी दरमहा मिळणाऱ्या १,५०० रुपयांसाठी शासनाची फसवणूक करत होते.
टप्प्याटप्प्याने वेतनातून रक्कम वसूल
माहिती व तंत्रज्ञान विभागाने तयार केलेल्या यादीत जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक तसेच महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम टप्प्याटप्प्याने वळती करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभाग चर्चा करत आहेत.
महाराष्ट्र दिवाणी नियम १९७९ अंतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईचाही प्रस्ताव पुढे आला आहे.
पेन्शनधारकांनाही लाभ
योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्त सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्धही कारवाई करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने संबंधित विभागांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
👉 ‘लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय ठरली असली तरी अशा फसवणुकीमुळे शासनाचा मोठा आर्थिक तोटा झाला असून, जबाबदारांवर कारवाई निश्चित आहे.