राज्यात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू!

राज्यात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; नगरपालिका, नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया सुरू!

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई, छत्रपती संभाजीनगर दि १० :- राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल आजपासून वाजला आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पातळीवर अद्याप औपचारिक युतीबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी स्थानिक नेते स्वबळावर किंवा सोयीच्या आघाड्यांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर पक्षाच्या अधिकृत चिन्हाशिवायही उमेदवार मैदानात उतरतील.

कोरोना काळात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे होत आहेत. पहिल्या टप्प्यात ६,८५९ जागांसाठी मतदान होणार असून, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेकडून होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय आणि नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग प्रणाली लागू राहणार आहे.

राज्यातील सर्व २३६ जुन्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या १० अशा एकूण २४६ नगरपालिकांची मुदत संपल्याने या निवडणुका होत आहेत

स्वबळाचा नारा – पक्षांमध्ये स्थानिक आघाड्यांचा प्रयोग

भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या सर्वांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अनपेक्षित युती आणि समीकरणे दिसू शकतात. युतीमुळे जागा कमी मिळतात आणि इच्छुक नाराज होतात, त्यामुळे स्वबळावर लढण्याचा कल अधिक दिसत आहे.

विचित्र युतींची चाहूल

कर्जत (रायगड) येथे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) एकत्र लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. ही युती मात्र पक्षचिन्हाशिवाय असेल. कोकणात राणेंविरोधात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतरच या समीकरणांचे खरे चित्र स्पष्ट होईल.

पार्थ पवार जमीन व्यवहाराचा राजकीय परिणाम

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन खरेदी प्रकरणाची चर्चा रंगली आहे. टीकेनंतर अजित पवारांनी हा व्यवहार रद्द केला असला, तरी या वादाचा परिणाम पुणे विभागातील निवडणुकांवर होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

निवडणूक कार्यक्रम एकदृष्ट्या :

🏙️ नगरपालिका : २४६

🏘️ नगरपंचायती : ४२

🗳️ एकूण जागा : ६,८५९

📅 अर्ज दाखल : १० ते १७ नोव्हेंबर

🗓️ अर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंत

🗳️ मतदान : २ डिसेंबर

📦 मतमोजणी : ३ डिसेंबर

विभागनिहाय संस्थांची संख्या :

कोकण - २७ | नाशिक - ४९ | पुणे - ६० | संभाजीनगर - ५२ | अमरावती - ४५ | नागपूर - ५५

आता संपूर्ण राज्यात राजकारणाचा ताप वाढणार आहे – स्थानिक नेत्यांचे भविष्य ठरणार २ डिसेंबरला!