राजकारणात खळबळ; शरद पवार आणि अजित पवारांची भेट, चर्चेचं पडसाद उमटणार का?
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १ :- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये याआधीही विविध कारणांनी भेटी झाल्या असल्या तरी, पक्षफुटीनंतर या भेटींना विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. दोन्ही गटांमध्ये तीव्र राजकीय संघर्ष असताना झालेल्या या चर्चेकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेबाबत निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. सभेची तारीख आणि वेळ निश्चित करण्यावर भर देण्यात आला.
याबाबत अजित पवार म्हणाले,
"शरद पवार हे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्या मंडळाच्या घटनात्मक प्रक्रियेअंतर्गत कारखान्याच्या चेअरमनला काही अधिकार मिळतात. त्यामुळे निवडणुकीनंतर विश्वस्त मंडळ ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. आमचे सहा गट असून, प्रत्येक गटातून एक प्रतिनिधी निवडला जातो. त्यासंबंधी चर्चा झाली," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तथापि, या चर्चेदरम्यान काही राजकीय विषयांवरही संवाद झाला का, हे स्पष्ट झालेले नाही.