‘मोदीज मिशन’ पुस्तक प्रकाशन सोहळा: “नरेंद्र मोदी हे व्यक्तिमत्त्व नव्हे तर एक विचारधारा” – राज्यपाल आचार्य देवव्रत
महाराष्ट्र वाणी न्युज
राजभवन, मुंबई दि २४ :– “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते एक जिवंत विचारधारा, प्रेरणादायी शक्ती आणि राष्ट्रसेवेचे ध्येय असलेले द्रष्टे नेतृत्व आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.
लेखक बर्जिस देसाई यांनी लिहिलेल्या ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे भव्य सोहळ्यात पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल आचार्य देवव्रत पुढे म्हणाले की, “मोदींचे जीवन हे मानवतेची सेवा आणि देशाच्या उन्नतीसाठी अखंड समर्पणाचे उदाहरण आहे. सामान्य घरातून उगवून जागतिक नेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.”
मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या विकासाचा जो पाया घातला आहे, त्याची व्याप्ती शब्दात मांडणे अवघड आहे. समाजातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला – या चार घटकांच्या सबलीकरणावर त्यांनी भर दिला आणि हेच ‘विकसित भारत’ घडवण्याचे मूळ तत्त्व आहे. ‘मोदीज मिशन’ हे पुस्तक त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीकोनाचा दस्तावेज आहे.”
कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मोदी हे फक्त एक नेते नसून देशाचे वर्तमान आणि भविष्य घडवणारे परिवर्तनकारी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतात मागील अकरा वर्षांत झालेले बदल जगभरात प्रशंसनीय ठरले आहेत. संघर्षातून तेजस्वी यश मिळवण्याची प्रेरणा मोदींच्या कार्यातून मिळते.”
या पुस्तकातून नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वातील मूल्यनिष्ठा, शिस्त, राष्ट्रवाद आणि लोककल्याणाच्या नीतिमूल्यांचे प्रभावी दर्शन घडते, असे सर्व मान्यवरांनी मत व्यक्त केले.